अमरावती : एकदिवसीय विदर्भास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवाजी बीपीएड कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. अंजली ठाकरे यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सहानुभूती नको, संधी हवी. जिंकण्यासाठी सर्वांचे मनोविश्व सज्ज, असा अनोखा संदेश देत यावेळी सहभागी संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन : दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन, अमरावती संचालित जेल क्वार्टर, कॅम्प परिसर स्थित डॉ.नरेंद्र भिवापुरकरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळेच्यावतीने या एकदिवसीय विदर्भस्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय आबासाहेब उपाख्य श्री.गो.देवस्थळे स्मृती प्रित्यर्थ आयोजित विदर्भस्तरीय नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय क्रिक्रेट स्पर्धा २०२३ चे प्राचार्या डॉ.अंजली ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
दिव्यांगांना फक्त एक संधी हवी : याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ.गोविंदभाऊ कासट, दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी,सचिव ऍड. प्रदीप श्रीवास्तव, आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावती, अकोला, नागपूर, चिखलदरा येथिल संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहे. आम्हा दिव्यांगांना फक्त एक संधी हवी, तर आम्ही सुद्धा गगनाला गवसणी घालू शकतो, असे दर्शवित या क्रिकेट स्पर्धेत दमदार फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करीत या दृष्टिबाधित खेळाडूंनी आपल्या अंगीभूत क्रीडाकौशल्य यावेळी उपस्थितांना दर्शन घडविले. यादरम्यान आकर्षक फटकेबाजी फलंदाज करीत असताना या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी उपस्थित सहभागी क्रीडा स्पर्धकांच्यावतीने त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
दिव्यांगांचे क्रिकेट सामने : याप्रसंगी मुख्याध्यापक एन. एस. इंगोले, व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल, आदीसह डॉ.नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय येथील विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. आंतरशालेय विदर्भस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजन संदर्भात पंकज मुदगल व दृष्टिबाधित विद्यार्थी यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात. सर्व सामान्य खेळाडूंपेक्षा दृष्टी दिव्यांग यांचे सामने हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे असतात. त्यांच्या सामन्यांमध्ये नियम पण थोडे वेगळे असतात. अशा प्रकारचे दृष्टी दिव्यांगांचे क्रिकेट सामने बघण्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती. उपस्थित मंडळी त्यांना प्रोत्साहन देत होती.