अमरावती - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे, यंदा विदर्भात 15 जून दरम्यान मान्सून येण्याची शक्यता असल्याचे मत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बंड यांनी मांडले.
आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर 10 तारखेला मान्सून मुंबईत दाखल झाल्यास 15 जून दरम्यान विदर्भात मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, असे मत हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड यांनी व्यक्त केले.
विदर्भातील प्रामुख्याने अमरावती विभागातील शेती मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. पश्चिम विदर्भात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतीसह येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सूनचे आगमन वेळेवर होणार हे दिलासा देणारे आहे.