अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून 6 जानेवारीला एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या झाली होती. त्यानंतर त्या माथेफिरूने स्वतःही धारदार शस्त्राने स्वत:ला भोकसून घेतले होते. आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत असून पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे हेच मुलीच्या हत्येस जबाबदार असल्याचे, आरोप मृत मुलींच्या कुटुंबीयांनी केले आहे.
दिनांक, 6 जानेवारी रोजी सागर तितूरमारे नावाच्या युवकाने तिच्या मैत्रिणीला एका बागेत भेटायला बोलावले होते. त्यानंतर त्याने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वतःही भोकसून घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असून सध्या सागर हा कोठडीत आहे. यात तिच्या कुटुंबीयांनी दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्यावरही आरोप करत या हत्येस सोनवणेही जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितल्या नुसार, आरोपी सागर तितुरमारे हा सतत मुलीला त्रास देत होता. एकवेळा पळवून नेल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी सागरला ताब्यातही घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले होते. पण, त्यांनंतर सोनवणे हे चौकशीसाठी मृत मुलीला सतत फोन करत असत. तिच्या घरी जात असत चौकशीसाठी येत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनीही याकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर सोनवणे हे मुलीला सतत फोन करणे, तिच्या महाविद्यालयात जाऊन तिला सतत भेटणे, असे प्रकार सुरू केले. यास कंटाळून मुलीने घरी आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी सोनवणे यांना मुली भेटू नका, असे सांगितले. पण, सोनवणे न ऐकता भेटणे सुरूच ठेवले. दरम्यान, सागर तितूरमारे हा सतत नंबर बदलून मुलीला आणि मुलीच्या आईला फोन लावून त्रास देत होता. तक्रार करूनही पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी योग्य कारवाई न केल्यानेच माझ्या मुलीची हत्या झाल्याचे मृत मुलीच्या आईचे म्हणणे आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा - 'एटीएम' फोडायला आले अन् 'सीसीटीव्ही कॅमेरे' पळवले; अमरावती जिल्ह्यातील अजब प्रकार