अमरावती- संततधार पावसामुळे अमरावती शहरातील वडाळी तलावाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे. अमरावतीकरांसाठी पर्यटनाचे प्रमुख स्थळ असणारा वडाळी तलाव उन्हाळ्यात कोरडा पडला होता.
मार्च अखेरपासून वडाळी तलाव कोरडा पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे वडाळी परिसरातील विहिरीही आटल्या होत्या. तलावात प्रचंड प्रमाणात गाळ आणि कचरा साचला असल्याने महापालिका प्रशासनाने 2 दिवस श्रमदान आयोजित करून तलावातील गाळ काढण्याचा नावापुरता उपक्रम राबविला. मात्र, चार- आठ दिवस तलाव उपसण्याचे काम झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. त्यामुळे तलावाची दुरावस्था कायम राहिली.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तलावात अर्ध दफन आंदोलन करून तलाव स्वच्छ करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची दाखल घेऊन आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तलावतील गाळ काढण्यासाठी 2 कोटी रुपय देण्याची घोषणा केली हाती. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच उमटली असून प्रत्यक्षात तलावाच्या दुरावस्थेकडे कोणीही लक्ष दिले नाही.