अमरावती - प्रशासनाची दिशाभूल करून नियमबाह्य पद्धतीने अप्पर वर्धा धरणाचे गेट उघडल्याचा आरोप करत त्याविरोधात भाजपने अप्पर वर्धा धरणावर ठिय्या आंदोलन करत अवघ्या तीन तासात काँग्रेसने उघडलेले दोन गेट बंद केले आहेत. त्यामुळे पाण्यावरूरन अमरावतीतले राजकारण चांगलेच तापले आहे.
तिवसा तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अप्पर वर्धा धरणाचे पाणी आज (सोमवारी) सायंकाळी ४.४० वाजता सोडण्यात आले होते. मात्र, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाची दिशाभूल केली व नियमबाह्य पद्धतीने अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात आले असल्याचा आरोप भाजप आमदार अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांनी आज रात्री ६.३० वाजल्यापासून अप्पर वर्धा धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन सुरू करत धरणाचे गेट बंद केले.
आज 4.40 वाजता अप्पर वर्धा धरणाचे दोन गेट उघडण्यात आले होते. मात्र, काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपने प्रत्युत्तर देत नियमबाह्य पद्धतीने धरणाचे गेट उघडण्यात आले असल्याचा आरोप भाजपने केला असून धरणाला पाणी सोडण्यात आल्याने मोर्शी वरुड येथील शेतकऱ्यांना व नागरिकांना पाणी मिळणार नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन सुरू करत धरणाचे गेट बंद करण्याची मागणीही केली आहे.