अमरावती : शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब आहे. भर उन्हाळ्यात पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे वातावरण पूर्ण बदलले आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात प्रचंड गारपीट झाली असताना आता पुन्हा येत्या 24 तासात अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भात गारपीट आणि मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यामुळे होतो आहे अवकाळी पाऊस : पश्चिम विदर्भाचे अंतर्गत कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पश्चिम पश्चिम विदर्भावर हवेच्या खालच्या थरात चक्राकार वारे वाहत आहेत. पाकिस्तान आणि इराणवर हवेच्या मधल्या थरात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे विदर्भात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसात असल्याची माहिती, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे. वातावरणातील या बदलामुळे पश्चिम विदर्भात अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम तसेच पूर्व विदर्भात बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे.
विजांचा होणार प्रचंड कडकडाट: वादळी पावसासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांचा प्रचंड कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान वारे देखील वाहणार आहेत. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 29 एप्रिल पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात तर कुठे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस कमाल तापमान 36 ते 38 डिग्रीच्या आसपास राहील असे प्राध्यापक अनिल बंड यांनी स्पष्ट केले आहे.
धामणगाव रेल्वे प्रचंड गारपीट: मंगळवारी सायंकाळी अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील 52 हेक्टर जमिनीवरील शेती खराब झाली आहे. या अवकाळी पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील तीळ, मिरची, कोहळे, भेंडी, मूग, टमाटर, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 37 घरांची अंशतः पडझड झाली तर जनावरांचा एक गोठा पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा: Unseasonal Rain अवकाळी पावसाचा 780 गावांना फटका 65 हजार शेतकऱ्यांचे नुकसान