अमरावती- जिल्ह्यात कोरोनामुळे एक व्यक्ती दगावला असून सद्या तीन कोरोनाबधित रुग्णांवर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीकरांसाठी येणारे 15 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा- Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि पोलीस उपायुक शशिकांत सातवा यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना संदर्भात किल्ह्यतील आजच्या परिस्थितीची माहिती पत्रकारांना दिली.
अमरावतीची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी येणारे 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. कोरोना वाढणार नाही यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून नागरिकांनी 15 दिवस घराबाहेर न पाडता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सध्या घरोघरी पोचणाऱ्या आरोग्य पथकासोबत पोलिसांचा बंदोनस्त आहे. चार दिवसात आरोग्य पथकाचे सर्व्हेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर शहरातील महत्वाच्या चौकात पुन्हा एकदा पोलीस सक्रिय होणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने जप्त करुन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ठेवण्यात येणार आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आता 15 दिवस अमरावतीकरांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हंटले आहे.