अमरावती - लग्नात सहसा बँड बाजा, डीजे, संगीताच्या तालावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून शहरापासून ते अगदी ग्रामीण भागात रुजला आहे. परंतु, आता ही बातमी जरा वेगळी आहे. तुम्ही नेहमी नवरदेवाची रात्रीला निघणारी वरात पाहली असेल ज्यात घोड्यावर बसलेला नवरदेव, अन् त्याच्या साथीला बँजो, डीजेवर नाचणारी तरूणाई. पण शनिवारी अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील हरम गावात एक आगळी वेगळी, सोबतच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा सांगणाऱ्या दिंडीत या गावातील नवरदेव दिसला.
अमरावतीच्या हरम येथील मुकुंद रामकृष्ण आकोटकर या तरुणाचा नागपूरच्या काटोल तालुक्यातील दिग्रज येथील प्रीती अर्जुन कोहळे या तरुणीशी आज विवाह होणार आहे. त्यासाठी परंपरेनुसार शनिवारी सायंकाळी नवरदेवाच्या राशी काढल्या गेल्या. परंतु, या वरातीत डीजे नाही, बँड नाही, पण महाराष्ट्राची परंपरा सांगण्याऱ्या वारकरी संप्रदायाच्या दिंडीत मोठ्या दिमाखात नवरदेव बुवा दिसले. आपली महाराष्ट्रीय संस्कृती आज जोपासली गेली पाहिजे हा या मागचा आकोटकर कुटुंबीयांचा उद्देश होता.
नवरदेवाचे वडील रामकृष्ण आकोटकर हे स्वतः कीर्तनकार आहेत. मागील तीस वर्षांपासून ते वारकरी संप्रदायात कार्यरत असून त्यांचीच ही संकल्पना आहे. या नवरदेवाच्या वरातीत 5 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळीसुद्धा ही आगळी वेगळी वरात पाहून आनंदी झाले. तेही भजन-कीर्तन, गाण्यात व फुगडी खेळण्यात दंग झाले होते. यावेळी नवरदेवानेही आपल्या वरातीचा मनमुराद आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. पोटच्या मुलाची लग्नात हौस पूर्ण करण्यासाठी वडील लाखों रुपये खर्च करतात. पण, इतर गोष्टींना फाटा देत ही आगळी वेगळी लग्नाची वरात काढल्याने ही वरात चर्चेचा विषय बनली आहे.