अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यातील कोरोनारुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांना, दुकानात काम करणाऱ्यांना कोविड चाचणी सक्तीची केली आहे. यासाठी चांदूर रेल्वेत दोन दिवस विशेष कॅम्पचे आयोजन केले असून मंगळवारी एकाच दिवशी २७४ लोकांनी चाचणी केली आहे. यासंदर्भात सोमवारी एक बैठक आयोजित करून तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी चांदूर रेल्वे तालुक्यात कोरोनाचाचणी वाढविण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
'तत्काळ कोरोना टेस्ट करावी'
चाचणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक सरस्वती शाळा येथे २३ मार्च आणि न. प. कन्या शाळा येथे २४ मार्च रोजी दुपारी १ ते ४पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोनाचाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच २३ मार्च रोजी सरस्वती शाळा व ग्रामीण रूग्णालय अशा दोन सेंटरवर २२१ आरटीपीसीआर व ५३ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. तर उर्वरित व्यावसायीकांनी, फेरीवाले, भाजीवाले यांनी तत्काळ कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.
दुकाने होणार सील
२५ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड टेस्ट करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे. सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून प्रमाणपत्र नसणाऱ्या दुकानावर सील करण्याची कारवाई करावी लागणार असल्याचेही तहसीलदार इंगळे यांनी सांगितले. यावेळी सरस्वती शाळेतील सेंटरला तहसीलदार राजेंद्र इंगळे, मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी आदींनी भेटी दिल्या.