अमरावती - जिल्ह्यात दिवसेंदिवस विविध प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अशातच आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच संकटात सापडत असलेल्या शेतकऱ्यांसोबत आता बियाण्यांमध्ये सुध्दा फसवणुक होत असल्याचे पुढे येत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथून अनधिकृत कपाशी बियाणे जप्त करून दोन आरोपींना अटक केल्याची कारवाई स्थानिक पोलीस व कृषी विभागाने संयुक्तरित्या रविवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान केली आहे. यामध्ये एक आरोपी फरार झाला आहे. यात २९ हजार १४६ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
६ हजार १३६ रूपयांचे अनधिकृत बियाणे जप्त
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी उज्वल आगरकर, अमरावती जि. प. चे जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी विभागाचे अनंत मस्करे, दादासो पवार तसेच चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, पोलीस कॉन्स्टेबल शरद खेडकर या पथकाने चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे जाऊन एका ठिकाणी झडती घेतली. आरोपी साहेबराव मेथाजी राठोड (वय ३२ वर्ष) रा. मांजरखेड यांच्याकडून ३०२८-४ जी अशा नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट, आर कॉट ६५९-४ जी नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट, सिकन्दर प्लस प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट व विजया हायब्रीड कॉटन सीड प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट असे एकुण ८ पॉकेट किंमत ६ हजार १३६ रूपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने आणले बियाणे
तसेच आरोपी रामफळ पूनिया (वय ५७ वर्ष) रा. मांजरखेड (मूळ रा. हरियाणा) या व्यक्तिकडे जोराड पॉवर विश्वास सीड या नावाचे ४५० ग्रॅमचे २ पॉकेट किंमत २३ हजार १० रूपये आढळून आले. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. यानंतर आरोपी साहेबराव राठोड यांनी लेखी दिलेल्या जबाबानुसार त्यांना बियाणे दिनेश दुबे (वय ३२ वर्ष) रा. बासलापूर यांनी ८०० रुपये प्रति पॉकेट या दराने विक्री करिता दिले होते. यावरून आरोपी साहेबराव मेथाजी राठोड, रामफल पुनिया व दिनेश दुबे यांनी बनावट वेस्टन छापलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने आणले होते. त्यामुळे त्यांच्यावर भादंवी कलम ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१ सहकलम बियाणे नियम १९६८ चे कलम ७, ८, ९, १०, सहकलम पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गणेश मुपडे, पो.काॅ. शरद खेडकर करीत आहे. या प्रकरणाची फिर्याद चांदूर रेल्वे पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश खोबरखेडे यांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपी साहेबराव मेथाजी राठोड व रामफल पुनिया यांना अटक करण्यात आली असुन, आरोपी दिनेश दुबे फरार आहे.
हेही वाचा - मुंबईत मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात