अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे भाजप अंतर्गत दोन गटातील गटबाजी उफाळून आली आहे. रमेश बुंदिले आणि तिकीटासाठी इच्छुक असलेल्या अन्य एक दावेदार असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवक सिमा सावळे यांच्या समर्थकांनी एकमेकांसमोर उभे ठाकून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे अंजनगाव सुर्जीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. एकीकडे बुंदिले समर्थक जल्लोष साजरा करीत असताना साळवे समर्थकांमध्ये नैराश्येचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या दोन गटांतील गटबाजी डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा - आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
सुरुवातीपासून शिवसेनेचा गढ असलेल्या दर्यापूर मतदारसंघात गत निवडणुकीत युती नसताना भाजपचे रमेश बुंदिले यांनी विजय मिळविला. आगामी निवडणुकीत पुन्हा भाजप-सेनेची युती झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असेही बोलले जात होते. मात्र, युतीत अखेर हा मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला गेला. अशात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांचे नाव तिकीटासाठी आघाडीवर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सीमा साळवे यांनी दर्यापुरातून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली होती. त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम, महिला मेळावे, प्रचार माध्यमातून स्वत:चा एक मोठा गट निर्माण केला. त्यामुळे भाजपचे तिकीट दोघांपैकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती.
हेही वाचा - निष्ठावान कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम; 10 रुपयांची नाणी साठवून 5 हजार रुपये दिले अर्ज भरायला
आपल्याच नेत्याला भाजपची उमेदवारी मिळणार, असे दावे दोघांच्याही पाठीराख्यांकडून केले जात होते. दरम्यान, भाजपची यादी जाहीर झाली आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर एकीकडे बुंदिले यांच्या पाठीराख्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर साळवेंच्या समर्थकांमध्ये नैराश्य पसरले होते.
हेही वाचा - 'षडयंत्र रचणाऱ्याला खडसेंनी समोर आणावेच'
भाजपकडून दर्यापुरातून निवडणूक लढवायचीच, या इराद्याने सीमा साळवे पुण्यातून थेट दर्यापुरात दाखल झाल्या होत्या. त्यांनी पहिले टारगेट भाजपचेच विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांनाच केले. बुंदिले यांचे जनसंपर्क कार्यालय ज्या संकुलात आहे तेथेच सिमा साळवे यांनीही आपले कार्यालय थाटले. उमेदवारी जाहीर होणार असल्याने या संकुलात दोन्ही नेत्यांच्या पाठीराख्यांनी गर्दी केली होती. उमेदवारी जाहीर होण्याआधी त्यांच्याकडून आपापल्या नेत्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू होती. दुपारी रमेश बुंदिले यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याचे जाहीर होताच बुंदिलेंच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतरही साळवेंच्या समर्थकांनी आपली घोषणाबाजी सुरुच ठेवली होती.
या घडामोडीनंतर सिमा साळवे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साळवे यांचे बहुतांश समर्थक भाजपचेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे साळवे आपल्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या तर भाजपसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे.