अमरावती - जिल्ह्यातील वरुड येथील शेकधरी धरणात बुडाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद मुसिफ मो. एजाज (वय २३) व अब्दुल आरिष अब्दुल शहीद (वय २३) अशी मृतांची नावे असून ते जीवलग मित्र होते.
सायंकाळच्या सुमारास दोघेही मित्र धरणाकाठी फिरण्यासाठी गेले होते. मात्र, धरणाकाठी त्यातील एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. मित्राला पाण्यात पडलेला पाहताच, दुसऱ्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा खोलीचा थांगपत्ता न लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.