अमरावती - महावितरणच्या लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चांदुर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तिवसा तालुक्यात घडली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील आठ दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबल्यामुळे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी विशंभर काकडे (वय 61 वर्ष, रा. वडूरा, ता.चांदुर बाजार) गेले होते. यावेळी शेतात लोंबकळलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना महावितरणाच्या चुकीमुळे घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
तर दुसऱ्या घटनेत जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेता भोवताली लावलेल्या विद्युत तारांचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विजय बापुरावजी कामडी (वय 50 वर्ष, रा. सातरगाव, ता. तिवसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विजय कामडी हे एका शेतात पिकाच्या देखरेखीचे काम करत होते. त्याच कामासाठी शुक्रवारी रात्री शेतात जात असताना, शेतातील पिकांच्या संरक्षणसाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी उशीरा पर्यंत विजय कामडी घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.