अमरावती - मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील डाबका रेल्वे येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा शेतात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वन्यजीवांपासून मका पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या वीजवाहक तारांच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
डाबका रेल्वे येथील शामलाल धांडे यांच्या शेतात सख्ख्या भावांचे मृतदेह आढळून आले. दारासिंग मोती जांभेकर आणि रामकिसन मोती जांभेकर असे दोघा भावांची नावे आहेत. धांडे यांच्या शेताच्या शेजारीच जांभेकर यांचे शेत आहे. हे दोन्ही भाऊ शेतीची कामे आटपून धांडे यांच्या शेतातून डाबका गावाकडे परतत होते. त्याचवेळी दोघांनाही विजेचा धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनास्थळी विजेची तार दिसून येत नाही.
हेही वाचा - तिबार पेरणी झाल्यानं शाळेचे उरलेले शुल्क भरण्याची परिस्थिती नाही, पण टीसी-मार्कशीट देण्यास शाळेचा नकार
दरम्यान, या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर विजेचे तार कोणीतरी काढून घेतली असावी, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. आधीच नापिकीने त्रस्त झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी यंदा मेळघाटात सोयाबीन सोडून मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. वन्य प्राणी या पिकाची नासाडी करत असल्याने बहुतांशी शेतकरी पिकाच्या रक्षणासाठी शेतात विविध उपाययोजना करतात. परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेताला कुंपण लावले आहे, त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.