अमरावती - जिल्ह्यातील या अचलपूर शहरात दोन सख्ख्या ( Achalpur Brother Suicide ) भावांनी मंगळवारी रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अचलपूरच्या बुंदेलपुरा भागातील रहिवासी असणारे प्रभात मिश्रा व अरुण मिश्रा, असे या दोन्ही भावांची नावं आहेत.
कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज -
अचलपूर येथील रहिवासी प्रभात आणि अरुण मिश्रा या दोन्ही भावांचे एकमेकांशी चांगले संबंध असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभात मिश्रा हे अचलपूरला राहतात, तर अरुण मिश्रा हे कामानिमित्त औरंगाबादला होते. अरुण मिश्रा यांच्या मुलीचे नुकतेच लग्न जमले होते. मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी अचलपूर परिसरात असणारी शेती विकण्यासाठी अरुण मिश्रा हे अचलपूरला घरी आले होते. दरम्यान दोन्ही भावांनी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीत उडी मारून आरमहत्या केल्याने अचलपूर शहर हादरले आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
पोलोस करीत आहे तपास -
बुंदेलपुरा परिसरात विहिरीत दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडताच परतवाडा पोलीस घटनास्थळी पोचले. विहिरीतील दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही भावांनी नेमक्या कुठल्या कारणांमुळे असे टोकाचे पाऊल उचलले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.