अमरावती - मालतेकडी मार्गावर संशयीतरीत्या उभ्या असणाऱ्या दोन दुचाकीस्वारांची फ्रेजरपुरा पोलिसांनी झडती घेऊन त्यांच्याजवळून १० हजार रुपये किमतीच्या ५ चाकूंसह एक दुचाकी जप्त करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर फ्रेजरपुरा पोलिसांनी ही कारवाई केली.
यश सुरेश चव्हाण (वय १९ वर्षे, रा. जय श्रीराम नागर कांडली रोड परतवाडा) आणि प्रवीण सुंदरलाल चव्हाण (वय २८ वर्षे, रा.दाधिपेढी, ता.भातकुली, अमरावती), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज सकाळी १० वाजता फ्रेजरपुरा पोलिसांना दोन दुचाकीस्वार चाकू घेऊन मालतेकडी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अय्युब हिराजी शेख हे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शेखर आणि विजय यांच्यासह मालतेकडी परिसरात पोहोचले. यावेळी यश आणि प्रवीण हे एका दुचाकीजवळ संशयियरीत्या उभे असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांची झाडती घेतली. यावेळी यश चव्हाण याच्या पॅन्टच्या बेल्टला तीन लोखंडी चाकू कव्हरमध्ये असल्याचे आढळले. या तिन्ही चाकूंवर यूएसए कोलंबिया 778ए असा उल्लेख असून या तिन्ही चाकूंची किंमत ६ हजार रुपये आहे.
पोलिसांनी प्रवीण सुंदरलाल चव्हाण यांची झडती घेतली असता त्याचा पॅन्टला 2 लोखंडी चाकू कव्हरमध्ये आढळले. या दोन्ही चकुंवरही यूएसए कोलंबिया 778ए असा उल्लेख आहे. या दोघांजवळ सापडलेल्या दुचाकीचे कुठलेही कागदपत्र आरोपींकडे मिळाले नाही. हे चाकू या दोघांनी नेमके कुठून आणि कशासाठी आणले. यापूर्वीही त्यांनी असे चाकू कोणाला विकले याबाबत पोलीस तपास करत आहेत.