अमरावती - जगाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या त्यांच्या जन्मस्थळी पहाटे साडे पाच वाजता हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावलीतील नागरिकांनी आपापल्या घरीच जन्मोत्सव सोहळा पार पाडला. गावकऱ्यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता करून हजारो पणत्यांनी लावल्या होत्या.
असा पार पडला सोहळा -
यावली शहीद येथील तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी पहाटे साडे चार वाजता या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. एक तास तुकडोजी महाराजांची भजने आणि त्यांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर पहाटे साडे पाच वाजता तुकडोजी महाराजांचा पाळणा हलला आणि जन्मोत्सव पार पडला. त्यानंतर सामुदायिक ध्यान व महाआरती पार पडली. मागील तीन दिवसांपासून यावली शहीद येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू होता.आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाले.
दरवर्षी ग्रामजयंतीला गावात प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास मांडली जाते आणि रांगोळ्या काढल्या जातात. तोच उत्साह यंदा देखील पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी आपापल्या घरीच ग्रामजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणारी शिक्षिका!