अमरावती: आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नागपूरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक समृद्धी महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खाली कोसळला. ट्रकचा काही भाग पुलाच्या कडेलाच लटकला होता. या अपघातामुळे चांगलीच खळबळ उडाली. काही वेळासाठी घटनास्थळी अनेक वाहने थांबली होती.अमरावती जिल्ह्यात धामणगावरेल्वे तालुक्यातील शेंदुर्जना लगत निमगव्हाण या गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे.
एक ठार एक गंभीर: नागपूर वरून हा ट्रक लोखंडी साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. समृद्धी महामार्गावर भरदा वेगात असणाऱ्या हा ट्रक निमगव्हाण येथे चक्क पुलाखाली कोसळला. या ट्रकमध्ये दोन जण स्वार होते. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांसह पोलीसांनी धाव घेतली. जखमी व्यक्तीला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गावरून ट्रक वेगात जात होता. जेव्हा अपघात झाल्यावर लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका: याआधीही बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. अपघातात 3 जण ठार तर 2 जखमी झाले होते. ही घटना 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील मेहकर जालना रोडवर एका कारने दुसऱ्या कारला मागून धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2 जण गंभीर जखमी झाले होते.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात: नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता प्रवासी जखमी तर एक प्रवासी ठार झाले होते. समृद्धी महामार्गावर सकाळी साडेचार वाजता देऊळगावराजा नजिक असोला गावाजवळ एमएच 20 ईएल 4999 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पलटी झाली होती. अपघातानतंर रस्ताच्या बाजुला उभ्या असलेल्या एका प्रवाशाला ट्रकने चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला होता.