अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला लुटारूंनी चाकूचा वार करून लुटले होते. लुटारूंनी २ लाख २६ हजार रुपये रोकड, टॅब व बायोमेट्रिक यंत्र लुटले. तेव्हा एका लुटारूचा बूट घटनास्थळापासून काही अंतरावर पडला होता. त्या बुटावरून राजापेठ पोलिसांनी तिन्ही लुटारूंना ताब्यात घेतले. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. सै. आतिफ सै. इरफान (२३), राहुल गौतम श्रीरामे (२०, दोघेही रा. बिच्छुटेकडी) अशी आरोपींची नावे आहेत.
बूट घटनास्थळावर पडला : ९ नाेव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:१५ वाजता दस्तूरनगर परिसरातील भाग्योदय कॉलनीमध्ये पाठलाग करून श्रीकांत तायडे (३२, रा. येरला) यांना चाकू वार करून लुटण्यात आले होते. फायनान्स कंपनीने दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्याचे काम तायडे करतात. ते बिच्छुटेकडी भागात दर बुधवारप्रमाणे कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी जात होते. बिच्छुटेकडी भागातील महिलांकडून त्यांनी कर्ज वसुलीची रक्कम घेतली व ते निघाले. त्यावेळी तिन्ही लुटारू त्यांच्या मागावर होतेच. ते बिच्छुटेकडी मार्गे भाग्योदय कॉलनीजवळ पोहोचले असता, तिघांनी दुचाकी आडवी करून तायडे यांना अडवले. श्रीरामेने तायडेंच्या मांडीत चाकू मारला. त्यानंतर आतिफ व त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्याने २ लाख २६ हजार रुपये असलेली बॅग हिसकावली व दुचाकीने पळाला.दरम्यान, घटनास्थळापासून काही अंतरावरच लुटारूंची दुचाकी घसरली. त्यावेळी श्रीरामेच्या पायातील एक बूट घटनास्थळावर पडला होता. तो बूट पोलिसांना मिळाला. त्या आधारे तपास सुरू झाला.
फिर्यादीला दाखविला जोडा : तो बूट तायडे यांना दाखविण्यात आला. मात्र, ते त्यावेळी उपचार घेत होते. त्याचवेळी त्यांनी आपण प्रत्येक बुधवारी बिच्छुटेकडी भागात वसुलीसाठी जात असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस बिच्छुटेकडीला पोहोचले. तेथे तो बूट राहुल श्रीरामे याचा असल्याची माहिती मिळाली.इन्स्टाग्रामवर राहुल श्रीरामेचे काही व्हिडीओ पोलिसांना दिसले. त्यामध्ये त्याच्या पायात तोच बूट असल्यामुळे लुटारू निष्पन्न झाले.
लुटीनंतर मुंबईत केली मजा : लुटीनंतर ते यवतमाळकडे पसार झाले. तसे लोकेशनही पोलिसांना मिळाले. संपूर्ण राेख उडवल्यानंतरच ते शहरात आले. याची माहिती गुरुवारी रात्री राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. ती रक्कम घेऊन सुरुवातीला नागपूर व नंतर एक महिना ते मुंबईत थांबल्याचे पोलिसांनी सांगितले. राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पीएसआय गजानन काठेवाडे, सागर सरदार, छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुळधे, नरेश मोहरील यांनी ही कारवाई केली.