अमरावती - राज्यात कडाक्याच्या उन्हाला सुरवात झाली आहे. त्यात विदर्भातील तापमान अधिक असते. वाढत्या तापमानाने जिथे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होते. या तापमानाचा फटका फळांना बसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु या नुकसानावर तिवसा तालुक्यातील डेहणी या गावतील प्रगतशील शेतकऱ्याने एक तोडगा काढला आहे. त्यांनी चक्क आपल्या ६० एकर वरील बागेतील पेरूंना विशिष्ट प्रकारचे आच्छादन लावले आहे. रंगराव लव्हाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या या कल्पक्तेमुळे ऊन, गारपीट व इतर रोगापासून पेरुचा बचाव होत आहे.
उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी पॉलिहाऊस किंवा नेटचा वापर करतात. परंतु यापुढे जाऊनही लव्हाळे यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 60 एकर जागेवरील बागेतील प्रत्येक पेरूला विशिष्ट प्रकारचे आच्छादन केले आहे. झाडावरील प्रत्येक पेरुला आधी एक विशिष्ट कापड त्यानंतर कागदाचे आच्छादनाने व्यापला आहे.
दरवर्षी घेतले जातात लाखो रुपयांचे उत्पादन
रंगराव लव्हाळे हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. तिवसा तालुक्यातील डेहणी परिसरात त्यांच्या पेरूच्या बागा आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी पेरूची शेती करण्याचा निश्चय केला. मागील अनेक वर्षांपासून ते पेरूची शेती करतात. या पेरूच्या शेतीमध्ये अत्याधुनिक उपाययोजना करून पेरूची उत्तम गुणवत्ता त्यांनी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या पेरूलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
अनेकांच्या हाताला मिळाले काम
लव्हाळे यांची साठ एकर पेरूच्या बागा आहे. त्यामुळे सहाजिकच येथील परिसरातील महिला व पुरुषांना देखील मोठा रोजगार निर्माण झालेला आहे. लव्हाळे यांच्या शेतामध्ये अनेक मजूर काम करतात. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी रोजगार शोधावा लागत नाही.