अमरावती : Tribal house in Melghat : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या घनदाट जंगलात दुर्गम आणि अतिदुर्गम गावांमध्ये गेल्यावर अत्यंत सुंदर आणि आदर्श घरांची संस्कृती पहायला मिळते. मेळघाटातील आदिवासींच्या विविध वैशिष्टांपैकी त्यांच्या घराची रचना हे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य असल्याचं लक्षात येतं. उत्तर आणि दक्षिणमुखी अशीच घरांची रचना आपल्याला या गावांमध्ये बघायला मिळते.
आदिवासींच्या घरांचं असं आहे वैशिष्ट्य : मेळघाटातील कोणत्याही गावात गेलं तर त्या गावांमध्ये 40 ते 50 फुटांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकसमान मातीची घर बांधलेली दिसतात. विशेष म्हणजे ही सर्व घर उत्तर आणि दक्षिणमुखी आहेत. आपल्या घरापेक्षा संपूर्ण गावात सूर्याची किरण थेट यावी याला आदिवासी बांधव महत्त्व देतात, त्यामुळे उत्तर आणि दक्षिणमुखी घरांच्या मध्यात असणाऱ्या पूर्व पश्चिम मार्गावर पहाटे सूर्याचा प्रकाश पडल्यावर संपूर्ण गाव उजळून निघते. तसंच हे शुभ असल्याची आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. प्रत्यक्षातदेखील पहाटेच्या प्रकाशाने शेणा-मातीने बनलेली घरं असणाऱ्या गावात आगळीवेगळी प्रसन्नता जाणवते.
घराच्या आतील खांबाला महत्त्व : आदिवासींची घरंही खरंतर दोन-तीन छोट्या खोल्यांच्या झोपडीपुरतीच असतात. त्या घरांच्या निर्मितीवेळी मध्यभागी पाच ते दहा फुटांचा लाकडी खांब उभारला जातो. त्याची तांदूळ, गूळ, सुपारी आणि कुंकू वाहून पूजा केली जाते. या खांबालगतच गृहदेवता ठेवण्याची व्यवस्था केली जाते. त्या देवतेजवळ लाल कपड्यात कुंकू, गुळ ,तांदूळ बांधून ठेवले जातं. या खांबाची विधिवत पूजा झाल्यावर घर बांधण्यास सुरुवात होते.
शेणा-मातीने सारवलेलं घर : मेळघाटातील आदिवासी लोकांची घरं कायम शेणा-मातीनं सारवलेली असतात. बांबूंचे तट्टे तयार करून त्यावर गवत आणि माती लेपून घराच्या भिंती उभारल्या जातात. घरांचं छतदेखील बांबूंच्या कमचांद्वारे आच्छादन करून त्यावर गवत आणि सागवान वृक्षाची पानं टाकून तयार केली जातात. छत तयार करण्यासाठी ज्या पानांचा वापर केला जातो, त्याला कोरकू भाषेत 'पोट्या' असं म्हणतात.
तीन भागात बांधली जातात घर : मेळघाटातील आदिवासी बांधवांची घरंही तीन भागात बांधण्यात आली आहे. घराच्या समोरचा भाग हा मुख्य बैठक म्हणून वापरला जातो. या बैठकीचे छत एखाद्या व्यक्तीचे हात सहज टेकतील, असे अतिशय खाली आहेत. या बैठकीत जाण्यासाठीचं मुख्य दार हे अतिशय छोटं असून त्या दारातून आतमध्ये वाकूनच जाता येतं. बैठकीनंतर घराचा मधला भाग दोन भागात विभक्त करण्यात आलाय. एका भागात झोपण्याची व्यवस्था तर दुसऱ्या भागात स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आलीय. स्वयंपाकाच्या ठिकाणी चूल आणि लाकडं ठेवलेली असतात. विशेष म्हणजे चूलीतून निघणारा धूर बाहेर जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था या घरात नाही. घरात अगदी छोट्याशा ठिकाणी धान्य ठेवण्यासाठी भांडारगृह आहे. मातीच्या भांड्यांमध्ये त्या ठिकाणी धान्य भरून ठेवले जाते. आदिवासी घरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे घराच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तींबरोबर आपल्याच घरातून सहज बोलता येईल, अशी व्यवस्था करण्यात आलीय. एकाच रांगेत असणाऱ्या गावातील सर्वच घरं ही एकमेकांना लागून असल्यामुळे दोन घरांच्या आतील भिंतही एकच आहे. यामुळे शेजाऱ्यांशी सतत संपर्क आणि संवाद ठेवला जातो. तसंच शेजाऱ्यांशी घरातूनच बोलता येत असल्यामुळं गावालगत असणाऱ्या जंगलातील वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते.
घरात नाही देवघर : मेळघाटातील आदिवासी बांधव हे प्रचंड धार्मिक वृत्तीचे आहेत. मात्र त्यांच्या घरात कुठेही 'देव्हारा' नाही. घरात एका ठिकाणी आपल्या कुलदेवतेचं एक प्रतीक म्हणून काहीतरी ठेवलं जातं. मात्र घरात कुठल्याही देवांची पूजा वगैरे केली जात नाही. घरात 'देव्हारा' नसला तरी गावात मात्र ग्रामदेवता असते आणि त्या ग्रामदेवतेची होळी, दिवाळी यासह विविध सण उत्सवात पूजा केली जाते अशी माहिती सलोना येथील रहिवासी आणि जामलीवन शाळेतील मुख्याध्यापक अनिल झामरकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आता गत दहा-पंधरा वर्षात आमच्या मेळघाटात काही गावांमध्ये गणपती उत्सव साजरा व्हायला लागला. महादेवाला आम्ही मानतो त्यामुळे भगवान शंकराचे फोटो काही घरांमध्ये लावलेले दिसतात, अशीही माहिती अनिल झामरकर यांनी दिली.
शौचालय आणि स्नानगृहाला घराच्या परिसरात स्थान नाही : आदिवासींची घरं अतिशय नीटनेटकी आणि साफ, सुंदर आहेत. त्यांच्या घरात किंवा घराच्या परिसरात कुठेही शौचालय आणि स्नानगृह राहत नाही. शौचासाठी आदिवासी बांधव हे घरापासून दूर जातात, तर आंघोळीसाठी गावालगत असणाऱ्या नदीवर जातात.
झोपडीतून बाहेर येण्याचे स्वप्न : आम्हाला आमचं घर, आमची संस्कृती याचा अभिमान आहे. होळी असो किंवा दिवाळी अशा सण उत्सवांच्या काळात आम्ही शेणा-मातीनं आमचं घर सारवतो, घराला रंग देतो. मात्र आता पक्क्या घरात राहण्याचं आमचंही स्वप्न आहे. पक्क्या घरात राहायला जाताना आम्ही आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेपासूनच्या घरांची संस्कृती देखील टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू, असे कोहना या गावातील रहिवासी सरोज खंडे 'ई टीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा -