अमरावती - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोवारी जमातीला गोंड गोवारी अनुसूचित जमातीचा लाभ मिळत असताना अमरावती येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तांनी तसे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने अमरावती विभागातील शेकडो आदिवासी गोवारी समाज बांधव सोमवारी आदिवासी विकास भवनावर धडकल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
आदिवासी गोंडगोवारी जमातीतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना गत दोन वर्षांपासून सहआयुक्त बबिता गिरी या जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहे. असा आरोप आदिवासी गोवारी सेवा समितीचे अध्यक्ष राबसाहेब नेवारे यांनी केला आहे. याचा जाब विचारण्याकरिता नेवारे यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे एक शिष्टमंडळ सहआयुक्तांना भेटायला गेले. यावेळी आत्मदहन करण्याचा इशारा काही समाजबांधवांनी दिला असल्याने आदिवासी विकास भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागपूरसह राज्यातील सर्व विभागाच्या ठिकाणी गोवारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत असताना अमरावतीत कोणत्या कारणांमुळे हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न सहआयुक्त बबिता गिरी यांना विचारण्यात आला.
काही वेळातच बडनेराचे आमदार रवी राणा हेसुध्दा जाब विचारण्यासाठी आंदोलनस्थळी पोचले. यावेळी सहायक आयुक्तांनी कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच गोवारी समाजबाधवांना टप्प्याटप्प्याने जातवैधता प्रमाणपत्र दिले जाईल, असे आश्वासन सहायक आयुक्तांनी यावेळी दिले. आंदोलकांनी आजच सगळ्यांना जात वैधता प्रमाणात मिळावे, अशी मागाणी करीत सहआयुक्तांच्या दालनात आणि संजबांधवांनी कार्यल्यासमोर ठिय्य दिला आहे. राबसाहेब नेवारे यांच्यासह राजेंद्र राऊत, भीमराव सहारे, दिवाकर राऊत, राहुल नेवारे, गणेश वाघाडे आदी या आंदोलनात सहभागी आहेत.