अमरावती - विभागातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या अप्पर वर्धा धरणात 49 टक्के जलसाठा झाला आहे. तसेच पावसाळा सुरू असल्याने या धरणावर सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने येथे कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
अमरावती विभागातील सर्वात मोठा पाणी साठवणारा उर्ध्व वर्धा प्रकल्प हा जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिम्भोरा गावाजवळ आहे. 13 दरवाजे असलेल्या या प्रकल्पात यावर्षी 49 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरासह इतर भागातील पाणी प्रश्न मिटला आहे. दरम्यान, सध्या या धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. सगळीकडे पाणीच पाणी आणि त्या पाण्याभोवती माशांच्या शोधात फिरणारे पक्षी असे नयनरम्य दृश्य पर्यटकांच्या नजरेस पडत आहे.
यासोबतच चुलीवर भाजलेले मक्याचे कणीसही पर्यटकांच्या जीभेला भूरळ घालत आहे. यामुळे धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांमध्ये काही हौशी पर्यटक असल्याने ते पाण्यात उतरून पोहण्याचा प्रयत्न करतात. पर्यटकांच्या या हरकतीमुळे येथे केव्हाही अनुचित प्रकार घडू शकतो. मात्र, तरीदेखील प्रशासनाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना येथे करण्यात आलेली नाही. यामुळे पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे.