अमरावती - अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे अमरावती आता अनलॉकच्या दिशेने जात आहे. विदर्भाचे पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनलॉकनंतर हा पहिलाच शनिवार-रविवार असल्यामुळे आज सकाळपासूनच पर्यटकांची येथे ये-जा वाढली आहे. चिखलदऱ्यामधील सर्व पॉईंट आता पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
'घरात कोंडून टाकल्यासारखे झाले होते'
मागील दोन-तीन दिवसांपासून चिखलदऱ्यात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे, वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. सकाळी पडणारे धुके व थंडी अनुभवण्यासाठी आता राज्यभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर चिखलदऱ्यामध्ये येताना दिसत आहेत. चिखलदऱ्यातील भीम कुंड, गाविलगड किल्ला, पवन चक्की देवी पॉइंट यासह इतरही पॉईंटवर पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. चिखलदऱ्यात आता पर्यटकांचा ओढा वाढल्याने, येथील व्यवसायीक आता समाधानी झाल्याचे, चित्र पाहायला मिळत आहे.