अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यंटकांसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू झाला असून फक्त जंगल सफारीला परवानगी देण्यात आली आहे. वनविभागाकडून पर्यटकांना परवानगी दिली आहे. मात्र, या पर्यटकांना चिखलदऱ्यात प्रवेश करण्यास नगरपरिषेदेने बंदी घातली. त्यामुळे पर्यटकांना आल्या पावली परतावे लागले. परिणामी या प्रकरणी पर्यटकांनी संताप व्यक्त केला.
देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन लागू केले होते. मात्र, आता लॉकडाऊनचे नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले. त्यामुळे वनविभागाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच पावसाळ्यात पर्यटकांची चिखलदऱ्यामध्ये प्रचंड गर्दी असते. पण, पर्यटनासाठी परवानगी नसून फक्त जंगल सफारीला ही परवानगी दिली. त्यामुळे जंगल सफारीसाठी पर्यटक दूरवरून येत आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी चिखलदरा नगर परिषदेने पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. तसेच जिप्सी व्यावसायिकांना देखील याचा फटका बसला आहे. वनविभागाने जंगल सफारीला परवानगी दिली. त्यावेळी चिखलदरा नगर परिषदेसोबत समन्वय साधला नाही का? असा सवाल जिप्सी व्यावसायिक आणि पर्यटक उपस्थित करत आहेत.