अमरावती : रोहित पटेल हे धारणीवरून परतवाडाच्या दिशेने जात असताना कोलकास लगत त्यांच्या वाहनासमोर चक्क वाघ रस्त्याने जात असल्याचा दिसला. पहिल्यांदाच वाहनासमोर वाघ दिसल्यामुळे त्यांनी आपली गाडी थांबवली. वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांनी या वाघाचे दर्शन घेतले. भर रस्त्यात ऐटीत चालणारा हा वाघ रोहित पटेल यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपला आहे. भर रस्त्यावर वाघ फिरत असल्यामुळे या मार्गावरून नियमित दुचाकीने जाणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
मेळघाटात सत्तरच्या जवळपास वाघ : सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सर्वाधिक सत्तरच्या जवळपास वाघ आहेत. अतिशय घनदाट जंगल असणाऱ्या मेळघाटात वाघांची संख्या अधिक असली तरी मेळघाटात सहसा कोणालाही वाघ दिसत नाही. शनिवारी रात्री मात्र धारणी परतवाडा ह्या मार्गावर कोलकासलगत वाघ चक्क रस्त्याने चालत असल्याचे रोहित पटेल यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. हा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
मेळघाटात पक्षी सर्वेक्षण : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे २६ ते २९ जानेवारीदरम्यान पहिले पक्षी सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली होती. त्यात मेळघाटात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पश्तिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासकांनी सर्वेक्षण मोहिमेत सहभागी नोंदवला होता.
मेळघाटातील पक्ष्यांची यादी: प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्ष्यांची नोंद झाली आहे. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती कळण्यास मदत होईल. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्ष्यांची प्रथमच नोंद झाली आहे. या नवीन नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचलेली आहे. मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमधे हिमालयन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक व काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक हे काही दुर्मिळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक या सारखे स्थलांतरित पाणपक्षी समाविष्ट आहेत.