अमरावती - महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये. असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेष बघेल यांनी भाजपावर निशाना साधला आहे. मोदींच्या विरोधात बोलले तर देशद्रोही ठरवले जाते. पुलवामा हल्ल्याची चौकशी का झाली नाही, दीडशे किलो आरडीक्स कुठुन आले, 15 लाख देणार होते ते कुठे गेले, असा सवाल बघेल यांनी केला. काँग्रेस उमेदवार आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी नांदगाव पेठ येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - हवा घेण्यासाठी सुरक्षा रक्षकाला केले बाजूला; उकाड्याने अमित शाह हैराण
भाजप सरकारने देशाला बेरोजगारीच्या खाईत टाकले आहे. या सरकारने जनतेची दिशाभूल केली. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या खाईत गेला आहे. देशात मंदीची लाट असली तरी छत्तीसगडमध्ये मंदी नाही. असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी केले.
दरम्यान, आमदार यशोमती ठाकूर यांनी बघेल यांचे स्वागत तुकडोजी महाराज यांची मूर्ती आणि ग्रामगीता देऊन केले. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. याठिकाणी अनेक थोर समाज सुधारक झाले. या मतदारसंघात तुकडोजी महाराज यांच्यासारखे संत होऊन गेले त्यामुळे हे आपले सर्वांचे भाग्य आहे असेही बघेल यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मुख्यमंत्री म्हणतात...तर राहुल गांधींची सभा आयोजित करा