अमरावती: गोवा वासीयांच्यावतीने दिला जाणारा पत्रकारितेतील सर्वोच्च अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील दोन पत्रकारांची निवड समितीकडून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मंचर (पुणे ) येथील मुक्त पत्रकार रमेश जाधव तसेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील पुण्यनगरीचे पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांचा समावेश आहे.
गोवा वासीयांच्या वतीने निवड: विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण लिखाण करून रमेश जाधव यांनी गेल्या 30 वर्षात अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली. पत्रकार रमेश जाधव तसेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील दैनिक पुण्यनगरचे पत्रकार उत्तम ब्राम्हणवाडे यांची 2022- 23 चा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरवल पुरस्कारासाठी गोवा वासीयांच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
गोवा येथील समारंभात होणार पुरस्कार वितरण: सदर पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्यातील महामंडलेश्वर शिवानंद महाराज दत्त महाराज देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख ५१००० रुपये, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ व महावस्त्र असे असुन पुरस्कार वितरण हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते तसेच केंद्रीय जलमार्ग व पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, व महराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला तोलार्ण पेडणे (गोवा ) येथे प्रदान करण्यात येणार आहे.