अमरावती - जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा मालखेड तलाव पूर्णपणे कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे नगपरिषदेद्वारे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरात काही शासकीय विहिरी आहेत. मात्र, त्यांच्या पाण्याची पातळी ही पूर्णपणे खोल गेलेली आहे. विहिरीला पाणी नाही. त्यामुळे नगर परिषद त्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडते. त्यानंतर मात्र त्या विहिरावर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. लहान मूल, महिला, तरुण, तरुणी, वृद्ध महिला या पाण्याचे भांडे घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी येतात.
चांदुर रेल्वे शहरा लागत नगर परिषदेच्या ३ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, त्या विहिरींचेही पाणी शहराला पुरत नाही. त्यामुळे नागरिक आपापल्या परिसरात घरातील भांडे, पाण्याचे ड्रम घेऊन टँकरची वाट पाहत असतात.
चांदुर रेल्वे शहरात गेल्या २ वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यासाठी नगर परिषद त्यांच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करते. मात्र, कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नागरपरिषद सक्षम नाही. त्यासाठी शासनाची मदत आम्हाला झाली पाहिजे, असे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी सांगितले.