अमरावती - कोरोनामुळे जग बदलले लोकांचे राहणीमान बदलले आहे. वर्क फॉर्म होम सुरू आहे. यात सर्वात नुकसान करणारी बाब म्हणजे शाळा सुद्धा मागील एक वर्षांपासून बंद आहे. जिथे मोबाईल आहे. चांगले नेटवर्क आहे. तिथे तुटके फूटके ऑनलाइन शिक्षणही सुरू आहे. परंतु जिथे मोबाईलला नेटवर्क नाही, ज्या पालकांची मोबाईल घेण्याची अर्थिक परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण म्हणजे स्वप्नच राहिले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यावर उपाय म्हणून अनेक गावातील उच्चशिक्षित तरुण तरुणी हे शिक्षक मित्र झाले. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील अमदरी या गावातील शिक्षक मित्र असलेल्या रत्नमाला खोब्रागडे या उच्चशिक्षित तरुणीची ही तळमळ आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घर होत पण घरावर टिन पत्रे नव्हते, अशा परिस्थितीत या तरुणीच्या भावाने उधारीचे पैसे आणले आणि घरांवर टिन पत्रे टाकले आणि विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू झाले. आज या घरात १० विद्यार्थी धडे गिरवत आहेत.
या तरुणीचीही शिक्षकमित्र म्हणून पुढाकार
रत्नमाला खोब्रागडे यांच्या घराच्या काही अंतरावरच प्रतिक्षा चेंडकापूरे ही तरुणी राहते. प्रतिक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिला कोरोना काळात शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला जी अडचण आली, ती अडचण आपल्या गावातील लहान मुलांना येऊ नये, म्हणून तिने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सरकारने आर्थिक मदत करावी
कोरोना काळात शाळा बंद आहे. त्यामुळे या तरुणीनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले आहे. शिकवण्याच्या मोबदल्यात त्यांना मुख्याध्यापकांकडून एक ते तीन हजारांपर्यंत मानधन मिळतो. जर शासनाने आम्हाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच पैसे दिले, तर आम्हीही स्पर्धा परीक्षेची शिकवणी वर्ग लावू शकतो, असे मत रत्नमाला खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनी बनवतायत 'रेडीमेड गुढी'..