अमरावती - अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वरूड तालुक्यात येणार्या झुंज येथे वर्धा नदीत मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोट उलटून अकरा जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. नदीत बुडालेल्या अकरा जणांपैकी तीन जणांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले आहे. इतर आठ मृतदेह शोधण्यासाठी जिल्हा बचाव पथक शोध मोहीम राबवत असून केंद्र आणि राज्याचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा - बळीराजाला लढण्याचे बळ दे, महिलांना सक्षम बनव; यशोमती ठाकुरांचे गौरीला साकडे
चार जणांची क्षमता असणाऱ्या बोटीत बसले तेरा जण
वरूड तालुक्यातील गाडेगाव येथे रवी माटरे या व्यक्तीच्या दशक्रियेसाठी त्यांचे नातेवाईक नारायण माटरे, किरण खंडारे, अश्विनी खंडारे, वृषाली वाघमारे, अतुल वाघमारे, निशा माटरे, आदिती खंडारे, मोहिनी खंडारे, पीयूष माटरे, पुनम शिवणकर आणि दोन वर्षांची चिमुकली वंशिका शिवणकर हे गाडेगावपासून काही अंतरावर असणाऱ्या झुंज या ठिकाणी वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठी आले होते. या ठिकाणी रवी माटरे यांच्या अस्थी नदीत शिरवल्यानंतर नदीकाठी बांधून ठेवलेली बोट नारायण म्हात्रे या व्यक्तीने सोडली आणि सोबत असणाऱ्या सर्व जणांना बोटीत बसवून नदीत नौका नयनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. वास्तवात या बोटीची आसनक्षमता चार जणांची असताना एकूण तेरा जण या बोटीत स्वार झाले. पाण्याने तुडुंब भरून वाहत असणाऱ्या नदीत ही बोट उलटली आणि हाहाकार झाला. यावेळी बोटीत स्वार तेरा जणांपैकी दोघेजण सुखरूप बचावले, मात्र इतर अकरा जण नदीत वाहून गेलेत.
आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पोहोचले घटनास्थळी
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असतानाच वरूड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, अमरावतीच्या जिल्हाधिकारी पौनित कौर, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी शोध मोहिमेची माहिती घेतली, तसेच शोध मोहिमेदरम्यान कुठलीही अडचण येणार नाही, याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
आठ मृतदेह अद्यापही बेपत्ता
शोध पथकाला नारायण माटरे, किरण खंडारे, यांच्यासह दोन वर्षांची चिमुकली वंशिका शिवणकर यांचे मृतदेह हाती लागले आहे. तर, इतर आठ जणांचा शोध सायंकाळी सात वाजेपर्यंत घेण्यात आला, मात्र रात्री अंधार पडल्याने, तसेच पावसामुळे अडथळा येत असल्याने आज थांबलेली शोधमोहीम बुधवारी सकाळी पुन्हा सुरू होणार आहे.
हेही वाचा - ना गावातील रस्ते फोडले, ना नाल्या खोदल्या तरी प्रत्येकाच्या घरी नळ; पाहा कसा आहे रघुनाथपूर पॅटर्न