अमरावती - कोरोना काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कापूस खरेदी बंद आहे. आता पेरणीला काही दिवसात सुरुवात होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे, असा आरोप माजी कृषी मंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत प्रतिकात्मक कापसाच्या गादीला काळा कपडा गुंडाळून त्यावर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे नाव लिहित ती गादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी मंदावली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, तर कर्ज वितरण सुद्धा बंद आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हे समजत नाही. शरद पवारांनी साखरेसाठी पॅकेज मागितले. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा व मागणी केली नाही. असंघटित कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे या झोपलेल्या सरकारच्या मंत्र्यांनी आता झोपूनच राहावे. त्यासाठी आम्ही कापसाची गादी त्यांना भेट देत आहे, असे बोंडे म्हणाले. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे उपस्थित होत्या.