पालघर : कासा पोलिसांनी धडक कारवाई करत मुले पळवणाऱ्या टोळीचा छडा लावला असून, सहा जणांना अटक केलीय. या टोळीच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका करण्यात आलीय. दोन्ही मुलांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलय. मुलं चोरणाऱ्या या टोळीत दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय? : याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात मुलं हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. कल्याण पोलीस या मुलांचा शोध घेत आहेत, अशातच अचानक कासा पोलीस गस्तीवर असताना एक टोळी संशयास्पद वावरताना आढळली. या टोळीतील सदस्यांमध्ये भांडणं चालू होती. ही टोळी म्हणजे एक मोठं कुटुंबच आहे. ही भांडणं सोडवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी त्यांनी सोबतच्या दोन मुलांकडे चौकशी केली असता, या दोन मुलांना या टोळीनं कल्याण येथून पळवून आणल्याचं लक्षात झालं.
सहा जणांच्या आवळल्या मुसक्या : कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, हवालदार मनोहर जाधव, जगदीश जाधव, इस्माईल चाँद सय्यद हे गस्त घालत असताना त्यांनी केलेल्या चौकशीतून या टोळीचा छडा लागला. पोलिसांनी विनोद रामबापू गोसावी (वय - 20), आकाश विजेश गोसावी (वय - 28), अंजली विजेश गोसावी (वय - 28), चंदा विजेश गोसावी (वय - 55), जयश्री अशोक गोसावी (वय - 25), राहुल रामअप्पा गोसावी (वय - 27) यांना अटक केलीय.
टोळीच्या ताब्यात असलेल्या 8 आणि 5 वर्षांच्या दोन मुलांची कासा पोलिसांनी चौकशी करून त्यांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात दिलं. या मुलांच्या चौकशीत त्यांना कल्याण येथून पळवल्यात समोर आलं. त्यानंतर कासा पोलिसांनी कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात संपर्क साधून बेपत्ता मुलांची माहिती घेतली. त्यानंतर मुलांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. चौकशी केल्यानंतर कल्याण पोलिसांनी मुलांना आई-वडिलांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांची कारवाई : पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हार विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणपत पिंगळे, कासाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, हवालदार मनोहर जाधव, जगदीश जाधव व इस्माईल चाँद सय्यद यांनी ही कामगिरी पार पाडली.
हेही वाचा
- राहुल गांधींनी दिली टेम्पो चालकाच्या घरी भेट; किचनमध्ये बनवली चक्क वांग्याची भाजी - Rahul Gandhi Maharashtra Visit
- निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशांचा मृत्यू - Sindhudurg Boat Accident
- महाराष्ट्रात एटीएस, एनआयएची मोठी कारवाई; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालन्यातून तिघांना घेतलं ताब्यात - NIA and ATS Raid In Maharashtra