अमरावती - अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महिला मजूर घेऊन जाणाऱ्या टवेरा कारने अचानक पेट घेतला. ही कार नांदगाव पेठ एमआयडीसी मधील मजूर महिलांना तिवसा येथे घेऊन जात होती. ही आग एवढी भीषण होती की क्षणार्धात या तवेरा कारचा कोळसा झाला. सुदैवाने यामध्ये प्रवास करणाऱ्या १४ महिला बचावल्या आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच तिवसा नगर पंचायतचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. नगर पंचायत कर्मचारी व तिवसा पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली.
वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे टळली जिवीतहानी-
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ एमआयडीसीत तिवसा येथील महिला रोज काम करण्यास जातात. नेहमी प्रमाणे आजही काम करून सर्व महिला चारचाकीने आपल्या घरी जात होत्या. अचानक शेंडोळा खुर्द येथे कारच्या इंजिन मधून धूर निघताच चालकाने तात्काळ सर्व महिलांना खाली उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही. वाहनाने पेट घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक २० मिनिट ठप्प झाली होती. तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी पोहचून यावर नियंत्रण मिळवले.
आठ दिवसांपूर्वीही लागली होती आग-
याच राष्ट्रीय महामार्ग सहावर आठ दिवसांपूर्वी रात्री दोन सुमारास रायपूर वरून सुरतकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सला आग लागली होती. या आगीतही ट्रॅव्हल्सचा जळून कोळसा झाला होता. त्यानंतर आता आठ दिवसात ही पुन्हा नवीन घटना घडली आहे.
हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी