अमरावती - विदर्भाच्या खवय्येगीरीला तोड नाही असे म्हणतात. अमरावती शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात खवय्यांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत म्हणूनच खवय्येगिरीतील विविध लोकांच्या इच्छापुर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रँडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉन्च करण्यात आली आहे. 'युअर हेल्थ इज अवर वेल्थ' म्हणजेच तुमचे आरोग्य हीच आमची संपत्ती या टॅगलाईन अंतर्गत लोकांना ही सेवा दिली जाणार आहे. ऑटोमॅटिक पाणीपुरी मशीनद्वारा खवय्यांना सात वेगवेगळ्या चवीमध्ये ही पाणीपुरी चाखायला मिळणार आहे. ही पाणीपुरी लॉन्च करणारा तरुण एमबीए आणि नोकरीचाही अनुभव असलेला आहे. एका शेतकरी पुत्राने हा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू केला आहे. अक्षय होले असे या तरुणाचे नाव असून अमरावतीच्या साईनगरजवळ त्याने सफल या नावाने ब्रँडेड पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. 40 रुपयात सात फ्लेवरचे पाणी असलेली पाणीपुरी दिली जाते. अशा प्रकारची पाणीपुरी विदर्भात केवळ आपल्याकडेच मिळत असल्याचा दावा अक्षयने केला आहे.
स्वादिष्ट पाण्याच्या मशीन सह पुरी बनवण्याची मशीन उपलब्ध असल्याने तो अमरावती, बडनेरा, चांदूर रेल्वे सह इतर भागातही पुरीची मागणी वाढत आहे. केवळ 45 रुपयांमध्ये 100 नग उपलब्ध होत असल्याने अनेक पाणीपुरी विक्रेते अक्षयकडे पुरीची मागणी करत आहे. एका तासात तब्बल 6 हजार एकसारख्या पुरी तयार होत असल्याने अक्षयचा भाऊ प्रतीकसुद्धा त्याला या कार्यात मदत करत आहे. मोठी ऑर्डर असल्यास घरपोच पुरी सुद्धा पोहचवण्याची व्यवस्था प्रतीक सांभाळत आहे.
पाणीपुरीसह मनोरंजन
सात वेगवेगळ्या स्वादिष्ट चवींचा आनंद घेताना तुमच्या मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था ‘सफल’ ने केली आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने पाणीपुरी खाताना तुमचे मनोरंजन व्हावे म्हणून दोन्ही बाजूने दोन रंगीत टीव्हीची व्यवस्था केली आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक ग्राहकाची तब्येतीची काळजी घेत ऑटोमेटिक स्वरुपात तुम्हाला स्वतः गोलगप्यांमध्ये आवडता फ्लेवर चाखायला मिळणार आहे. शिवाय हॅंडवॉश सह बेसिनची व्यवस्था सुद्धा इथे केली असल्याने तुमच्या स्वास्थ्याची अधिक काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच नवसारी, पोटे इस्टेटपासून ते बडनेरामधील लोकांची गर्दी होत आहे.
हेही वाचा - जळगाव : किनगाव अपघात प्रकरणी ट्रकचालकासह व्यापाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दोघांना अटक