अमरावती : तळेगाव दशासर येथील शंकरपटला दीडशे वर्षांपेक्षाही जुनी परंपरा आहे. चार दिवस यात्रेत हा उत्सव चालू असतो. या शंकरपटादरम्यान पहिले तीन दिवस हे पुरुषांचा शंकरपट या यात्रेत रंगतो आणि अखेरच्या दिवशी खास महिलांचा शंकरपट या यात्रेत रंगतो. तळेगाव दशासर येथे पुरुषांच्या शंकरपटाची परंपरा असताना सर्वात आधी भारती येवले या महिलेने या पटात धुरकरी म्हणून कामगिरी बजावली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या क्रांतिबेन जोशी यासुद्धा या पटात सहभागी झाल्या होत्या.
या वर्षी महिलांच्या शंकरपटात महिलांचा उत्साह दुप्पट शंकरपटाला महिलांची गर्दी पाहता तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाचे दिवंगत अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी 2000 मध्ये महिलांकरिता एक दिवसीय शंकरपटाला सुरुवात केली. आज या पटाने भव्यरूप घेतले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर धामणगाव वसाड यांसह विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतून महिला धुरकरी या शंकरपटात सहभागी होतात. 2016 मध्ये शासनाने राज्यातील सर्वच शंकरपटांवर बंदी घातली होती. या वर्षी ही बंदी उठल्यावर पुरुषांच्या शंकरपटा इतकाच उत्साह महिलांच्या शंकरपटातही कायम होता. तळेगाव दशासर येथील शंकरपटात पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीला संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय महत्त्व दिले जाते. विशेष म्हणजे शंकरपटात बाजी मारणाऱ्या बैलजोडीला बाजारात दहा ते पंधरापट अधिक भाव मिळतो.
यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल तळेगाव दशासर येथील या यात्रेत शेतकरी बैलांची खरेदी-विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात करतात. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीसाठी बैलांना लागणाऱ्या विविध वस्तूंची विक्रीदेखील तळेगाव दशासर येथील यात्रेत होते. वर्षभर शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी या यात्रेत होते. पोळ्यासाठी लागणारा बैलांचा साज डवरणी वखरणी, जु. अशा लाकडी साहित्याची खरेदी करण्यासाठी विदर्भातील शेतकरी या यात्रेत प्रामुख्याने येतात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तळेगाव दशासर येथील शंकरपटात चिवडा प्रसिद्ध आहे. फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, असा कच्चा चिवडा खाण्यासाठी पटशौकीन कुटुंबीयांसह या यात्रेत येतात. कच्च्या चिवड्यासाठी तब्बल दहा ट्रक फुटाणे आणि 40 ते 50 ट्रक मुरमुरे या यात्रेत आणले जातात. कच्च्या चिवड्याची सुमारे 30 ते 40 दुकाने या यात्रेत थाटली आहेत.
गावाच्या सन्मानासाठी आयपीएसची तयारी करणाऱ्या युवतीचा सहभाग आयपीएसच्या परीक्षेची तयारी करणारी तळेगाव दशासर येथील तनिष्का लोया ही तरुणीदेखील या शंकरपाटात धुरकरी म्हणून सहभागी झाली. आपल्या गावाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मी या शंकरपटात सहभागी झालो आहे. माझ्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी या शंकरपाटात सहभागी झाल्याचे तनिष्का लोया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.