अमरावती : स्वीडनचा मॅक्सिम कुझामीन आणि स्नेहल यांचा लग्न सोहळा बौद्ध रीतिरिवाजानुसार आज संपन्न झाला. हजारो किलोमीटरचे अंतर पार करून हा स्वीडिश तरुण आणि त्याचे कुटुंबिय अमरावतीत दाखल झाले आहे. स्नेहल इलेक्ट्रिक रोबोटिक्समध्ये एम एस असून स्वीडनमध्ये इंजिनियर म्हणून नोकरीला आहे. तर मॅक्सिम कुझामिन हा सेवानिवृत्त आर्मीचा जवान असून एमबीए झाले असून एका अमेरिकन कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरीला आहे.
स्वीडनमध्ये जुळल्या रेशीमगाठी : शहरातील अमर छत्रसाल नगर येथील प्रतिष्ठित नागरिक मनोज छापाणी यांची मुलगी स्नेहल हिने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण मुबंईत घेतले. इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर ऍटोनॉमिक्स एम एस चे शिक्षण घेण्यासाठी ती स्वीडन येथे गेली. याच दरम्यान स्नेहलची ओळख मॅक्सिम सोबत झाली. दोघांची मैत्री झाली. यानंतर मॅक्झिम व त्यांच्या परिवाराने वधूचे वडील मनोज छापाणी यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याला छापनी यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
बौद्ध रितीरिवाजाने मंगल परिणय : दोघांच्या घरात परवानगी मिळाल्यानंतर अखेर लग्नाची तारीख ठरली २६ फेब्रुवारी. अमरावती येथील प्राईम पार्क येथे रविवार २६ फेब्रुवारीला हा ‘आंतरराष्ट्रीय’ विवाह सोहळा संपन्न झाला. स्नेहलच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, हा लग्न सोहळा बौद्ध संस्कृतीने व्हावा. लग्न सोहळा बौद्ध भिक्षू संघाच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्वीडन येथील आलेल्या वराकडील पाहुण्यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती देण्यात आली. लग्न सोहळ्यासाठी स्वीडनहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी आली होती.
असे जमले सुत : स्नेहल ही आपल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली असता या दोघांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मॅक्सिमच्या आईवडिलांनी छापानी कुटुंबीयांकडे लग्नाची मागणी घातली. स्नेहलने ही सर्व बाब आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर वडील मनोज व आई आशा यांनी आपल्या मुलीला आपला होकार कळविला.
मॅक्झिमला शाहरूख खान आणि बॉलीवूडचे आकर्षण : मी शाहरूख खानचा विशेष चाहता असून मी त्याचे बरेच चित्रपट बघितल्याचे त्याने सांगितले आहे. कुछ कुछ होता है या प्रसिद्ध सिनेमातील एक डायलॉग ही त्याने म्हणून दाखवला. भारतात अमरावतीत आल्यानंतर कसे वाटते असे विचारल्यावर मॅक्झिम म्हणाला की, आपले दुसरे घर असल्याचे वाटत आहे. भारतीय नागरिक खूपच प्रेमळ आहे. येथील खाद्य पदार्थ विशेष आवडीने खात असल्याचे त्याने सांगितले. मी येथील सर्व गोष्टींचा खूप आनंद घेत असल्याचे त्याने ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.
बौध्द पद्धतीने पार पडला सोहळा : अमरावतीत बौद्ध पद्धतीने तर स्वीडनमध्ये तेथील रितीरिवाजानुसार आमचा विवाह पार पडणार असल्याचे वधू स्नेहलने सांगितले. छापानी व कुझामीन परिवाराची संमती वधू स्नेहल छापाणी वर मॅक्झिम कुझामीन यांच्या आई-वडिलांनी संमती दिल्यानंतरच सोयरीक जुळली. दोन्ही परिवारांचे या लग्नाला संमती असून भारतात बौद्ध रीतीरीवाजाने तर स्वीडन येथे त्यांच्या पद्धतीने हा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा पार पडणार असल्याचे मॅक्झिम यांनी सांगितले.
मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतले कष्ट : मी एक साधासुधा व्हेंडोर असून माझे उत्पन्नाचे स्त्रोत मात्र खूप कमी होते. पण तरीही मी मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी केले नाही. स्कॉलरशिप मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले. दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागल्या. परंतु केव्हाच कमी पडलो नाही. लग्नाच्या प्रस्तावाबाबत संपूर्ण शहानिशा करूनच नंतर आपण होकार कळवला होता, अशी माहिती वधू पिता मनोज छापाणी यांनी दिली.
हेही वाचा : Bada Hanuman Mandir Beed: बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान; जाणून घ्या काय आहे ख्याती