आमरावती - विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना सरकार केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात स्वारस्य नसलेल्या सरकारचे लक्ष वळवण्याच्या उद्देशाने पुढील आठवड्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यात एकाच वेळेस व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला आहे. हे आंदोलन ऊस आणि दुधासाठी होणाऱ्या आंदोलनाइतकच तीव्र असणार आहे, असे ते म्हणाले.
सर्वच भागातल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मताचे आम्ही आहोत. मात्र मुख्यमंत्री ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र्रात शेतीच्या पाहणीसाठी गेले तसे त्यांनी विदर्भात दौरा केला नाही. 64 मी. मीटरच्या वर पाऊस पडला असेल तरच पंचनामे करायचे, या अजब निकषांमुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
राज्य सरकारचे पॅकेज तुटपुेजे
वाशिम जिल्ह्यात शेतात भरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर लावावी लागते. हे चित्र मी स्वतः पाहिले. मात्र सरकारच्या निकषांमुळे शेतात पाणी भरले असतानाही मदत मिळत नाही, ही दुर्दैवी परिस्थिती आहे. सरकराने आता जे 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील केवळ साडेपाच हजार कोटी शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार असून हे पॅकेज तुटपुंजे आहे.
पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतायेत
पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक कारत असून त्यांच्यावर कारवाई करायला हवी. केंद्र आणि राज्य शासनाला विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी कळाव्यात या हेतूने पुढच्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस- सोयाबीन आंदोलन छेडणार आहे. जो पर्यंत सरकार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणार नाही, तो पर्यंत हे आंदोलन चिघळत राहणार असेही स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.