अमरावती - कृषी कायदा रद्द करा, मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे गेल्या आठवड्याभरापासून पंजाब, राजस्थान, हरयाणामधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीत पंचवटी चौकात असलेल्या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात भजन-कीर्तन करून केंद्र सरकारचा निषेध
यावेळी आंदोलनात भजन-कीर्तन करण्यात आले. तर शेतकरी आठ दिवसांपासून रात्र-दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला सुबुद्धी येवो, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. संघटनेच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
'तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार'
केंद्र सरकारने लागू केलेला कायदा मागे घ्यावा. जर ते विधेयक मागे घेतले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलन देशभर करणार असल्याचा इशाराही या वेळी आंदोलकांनी दिला आहे.