अमरावती - चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणाऱ्या दोन व्यक्तींचा केबल सारख्या क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात एकाचा खून झाला. ही घटना आज (18 एप्रिल) सकाळी ७ च्या सुमारास घडली. घटनेच्या केवळ एका तासातच आरोपीला अटक करण्याची दमदार कारवाई चांदूर रेल्वे पोलीसांनी ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात केली. सुखदेवराव मारोतराव लुटे (वय ४५ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथे राहणारे सुखदेवराव मारोतराव लुटे व आरोपी राजेश गोविंदराव मोहतुरे (वय ४५ वर्ष) हे एकमेकाच्या घराशेजारी राहत होते. त्यांचा अनेक दिवसापासून क्षुल्लक कारणावरून वाद होत असे. अशातच माझ्या घरासमोरून केबल का टाकली? यावरून शुक्रवारी सकाळी वाद निर्माण झाल्यामुळे दोघांचे भांडणात रूपांतर झाले. आरोपी राजेश गोविंदराव मोहतुरेने लोखंडी गजाने सुखदेव लुटे यांच्यावर हल्ला केला. यात लुटे यांचा जागीच मृत्यु झाला. खून झाल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार मगन मेहते यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिता तांगडे, कर्मचारी जगदिश राठोड, संदीप शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ढोले यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेच्या केवळ एका तासानंतर आरोपी राजेश मोहतुरे याला अटक केली. त्याच्याविरूध्द भा.दं.वी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
२१ एप्रिलला होते मुलीचे लग्न -
खडकपुरा येथे अनेक दिवसापासून मृत सुखदेवराव लुटे हे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. रामनवमीच्या (२१ एप्रिलला) दिवशी त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते. मुलीच्या लग्नपत्रिका वाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. सुखदेवराव हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या खुनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.