अमरावती : शाळेच्या भल्यामोठ्या परिसरात भाजीपाल्यासह फळांची लागवड करून चिमुकल्यांनी शाळेचा परिसर हिरवागार केला. विशेष म्हणजे पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करीत या चिमुकल्यांनी पाण्याचा एक थेंबही वाया न जाऊ देता मध्यान भोजनानंतर ताट, हात झाडांमध्ये धुण्याचा नियम अवलंबला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने शाळेच्या आवारात भाज्या आणि फळझाडांसह विविध फुलांची झाडं बहरली आहे. ही सुंदर अशी जिल्हा परिषदे उच्च प्राथमिक शाळा मेळघाटातील जैतादेही या छोट्याशा गावात आहे. विशेष म्हणजे शाळेच्या आवारात घेतलेल्या भाजीपाल्याची विक्री शाळेतील चिमुकले दर शनिवारी गावात बाजार भरून करतात.
1.25 एकर जागेत वृक्ष लागवड : चिखलदरा तालुक्यातील जैतादेही हे गाव सापन धरणात गेल्यामुळे या गावाचे पुनर्वसन 2005 मध्ये मूळ गावापासून 15 किलोमीटर अंतरावर करण्यात आले आहे. जैतादेही येथे 1969 पासून असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेचे देखील 2005 मध्ये या परिसरात गावासोबत स्थलांतर झाले. जैतादेही, लगतच्या मेमना या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकायला येतात. 2018 मध्ये या शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामुनकर, शिक्षक जितेंद्र राठी यांच्या संकल्पनेतून शाळेच्या परिसरात विविध रोपांची लागवड करण्याची कल्पना समोर आली. यानंतर ग्रामस्थांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न या दोन्ही शिक्षकांनी केला . 1.25 एकरचा परिसर या शाळेत उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याची कल्पना लगेच वास्तवात आली.
120 प्रजातींच्या 800 रोपांची लागवड : शाळेच्या आवारात शेवगा, आंबा, सिताफळ, जांभूळ, चिकू, अंजीर, डाळिंब, भोकर, गोड बदाम, बेल, कवट, आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, रिठा, ताम्हण चिंच, अडुळसा, मोह, चारोळी, टेंभुर्णी, वड, पिंपळ, उंबर, पिंपरी, बांबू , गुगुल, कापूर, सोनचाफा, शेंद्री, खंडू चक्का, पुत्रंजीवा, बकुळ, शिसम, मालकांगणी, चाफा, कांचन सीता, अशोक, चक्री, आवळा, फणस, करवंद, केळी, महोगनी, पॅशनफ्रुट, चित्रक, समुद्रशेष आदी अशा एकूण 120 प्रजातींची एकूण आठशे रोप विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लावण्यात आली.
विद्यार्थी राखतात झाडांची निगा : आपली शाळा हिरवीगार व्हावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यावर आता या शाळेत शिकणारे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व 95 विद्यार्थी शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांची नियमित निगा राखत आहेत. रोपांना पाणी देणे, ज्या झाडांची पानांची कापणी करायची आहे, त्या झाडांच्या पानांची कापणी करणे, रोपांना व्यवस्थित पाणी जावे म्हणून मातीचे आळे करणे हे संपूर्ण काम चिमुकले विद्यार्थीच मोठ्या आवडीने या शाळेत करताना दिसतात. बाग कामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तू शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वखर्चाने शाळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
वर्ग खोल्यांमध्येही बहरली हिरवळ : जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये देखील हिरवळ बहरलेली पाहायला मिळते. प्रत्येक वर्ग खोलीच्या दारासमोर कुंड्यांमध्ये झाडे लावलेली दिसतात तसेच वऱ्हंड्यात देखील हिरवी झाडे आणि वेली बहरलेली दिसतात.
परसबागेत भाज्यांचे उत्पादन : शाळेच्या परसबागेत पालक ,वांगी, टमाटर कोथिंबीर, मेथी, बटाटे अशा भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. शाळेतील मध्यान्न भोजनात ह्याच भाज्यांचा वापर केला जातो.
विद्यार्थी भरवतात गावात बाजार : आपल्या शाळेच्या आवारात पिकवलेला भाजीपाला हे विद्यार्थी चक्क दर शनिवारी गावात बाजार भरून विकतात. या विद्यार्थ्यांच्या बाजारामुळे दुर्गम परिसरात वसलेल्या जैतादेही आणि लगतच्या मेमना या गावातील आदिवासी बांधवांना भाजीपाला सहज उपलब्ध होतो आहे. भाजीपाला विक्रीतून मिळणारे पैसे गोळा करून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन हे चिमुकले आखात आहेत.
ताट आणि हात झाडांमध्ये धुण्याचा नियम : जैतादेही या शाळेच्या आवारात लावलेली भाजीपाला आणि फळांची झाडे जगवण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या वाटेला आलेल्या झाडांना पाणी देणे त्यांची निगा राखणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. गावात असणाऱ्या भीषण पाणीटंचाईमुळे शाळेतील मध्यान्न भोजनानंतर हे चिमुकले आपला हात आणि आपले ताट आपल्या झाडांमध्ये धुतात. पिण्यासाठी घरून आणलेले उरलेले पाणी झाडांना टाकतात. मधल्या सुट्टीत सर्व विद्यार्थी घरी जातात आणि पुन्हा पाण्याची बाटली भरून आणतात. शाळेत असताना हवे तितके पाणी पिल्यावर शाळा सुटल्यावर पुन्हा प्रत्येक जण आपल्या झाडांमध्ये उरलेले पाणी टाकूनच घरी जातो.
चिमुकल्यांना टरबूज पार्टीची प्रतीक्षा : जैतादेही या गावातील गरीब चिमुकल्यांना गतवर्षी टरबूज खायला मिळाले नाही. यामुळे शाळेतील शिक्षकांनीच त्यांच्यासाठी टरबूजची व्यवस्था केली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या टरबूज पार्टीच्या माध्यमातून मनसोक्त टरबूज खाल्ले होते. आता यावर्षी या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या आवारातच टरबूजाची लागवड केली आहे. शाळेच्या आवारातच लागलेल्या वेलींवर आता टरबूज यायला लागले आहे. महिनाभरानंतर हे टरबूज मोठे झाल्यावर हे चिमुकले शाळेतच टरबूज पार्टीचा आनंद लुटणार आहेत.
हेही वाचा - Rahul Gandhi New Look : राहुल गांधी दिसले नव्या लुकमध्ये! सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा!