अमरावती- समृद्धी महामार्गामुळे मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळा उद्धवस्त होऊन दोन विहिरी नष्ट होणार आहेत. यामुळे शाळेचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.
महाराष्ट्र शासनाचा महावत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेचा बराचसा भाग तुटला आहे. शाळेचे मैदान, दोन पाण्याच्या टाक्या आणि विहीरी तसेच मैदानाची संरक्षण भिंत याची नुकसानभरपाई मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांच्या शाळेत 426 विदयार्थी आहेत. पुर्णतः मतीन भोसले यांच्यावर अवलंबून असणारे विद्यार्थी आणि मतीन भोसलेंसह शाळेचे चार शिक्षक जिल्हाधिकाऱ्यांच्या दलनासमोर ठान मांडून आहेत.
लोक वर्गणीतून जमा झालेल्या 2 कोटी 77 लक्ष रुपयांतून खोदलेल्या विहिरी, क्रीडा मैदान, अभ्यासाचे ओटे सरकारने समृद्धी महामार्गासाठी उद्धवस्थ केले आहेत. शासनाने आम्हला ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही मतीन भोसले यांनी केली. रात्रीही मुलं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरून हटले नाहीत. हे आंदोलन काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.