अमरावती - 22 हजार रुपये न भरल्याने एका विद्यार्थ्यांला गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देणाऱ्या शाळेची बातमी ईटीव्ही भारतने दाखविली होती. अखेर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी दखल घेऊन त्या विद्यार्थ्यांला टीसी आणि मार्कशीट मिळवून दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसळी-कामनापूर येथील यश जगदीश काटगळे या शेतकऱ्याच्या मुलाला सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे. त्यासाठी त्याने वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सैनिकी शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यतचे शिक्षण घेतले. परंतु आता त्याला पुढील शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका शाळेत जमा करायची होती. मात्र, या सैनिकी शाळेने शिल्लक असलेली 22 हजारांची फी न भरल्याने टीसी आणि गुणपत्रिका देण्यास नकार दिला.
यावर्षी बोगस बियाणे व पावसाने सुरुवातीला दडी मारल्याने या विद्यार्थ्यांच्या वडिलांना तीबार पेरणी करावी लागली. आर्थिक अडचण असल्यामुळे ते फी भरु शकत नव्हते. त्यामुळे आपल्या मुलाला पुढील शिक्षण कसे द्यावे? असा प्रश्न त्यांना पडला होता. दरम्यान, या शेतकरी पुत्राची व्यथा ईटीव्ही भारतने दाखविल्यानंतर या बातमीची दखल शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेत या शेतकरी पुत्राला टीसी आणि मार्कशीट मिळवून दिले आहे.