अमरावती- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अमरावती जिल्ह्यात वसतीगृह व्हावे या मागणीसाठी आम्ही चार दिवसापासून उपोषणाला बसलो असताना एकाही लोकप्रतिनिधीनीं आमची दखल घेतली नाही. आमच्या मेळघाटातील आमदारांनाही आमच्या वेदना कळल्या नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदिवासीबांधव मात्र त्यांची निश्चितपणे दखल घेतील, अशा शब्दात आदिवासी आयुक्तालय समोर उपोषणावर बसलेल्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.
हेही वाचा- अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली, सर्व सुखरूप
अमरावती शहरात आदिवासी विभागाकडे अनेक वर्षांपासून जागा उपलब्ध असतानाही केवळ कमिशन मिळते म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना खासगी इमारतीच्या वसतीगृहात ठेवण्यात येत आहे. आदिवासी वसतीगृह यांच्या या सर्व खासगी इमारती या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून अनेक इमारतींना महापालिकेने नोटीसही बजावली आहे. भाड्याने घेण्यात आलेल्या आदिवासींच्या वसतीगृहांसाठी वर्षाला कोट्यवधी रुपये भाडे दिले जात आहे. चार दिवसांपासून हक्काच्या वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषण करणाऱ्या दोघाजणांची प्रकृती खालावली असताना आदिवासी आयुक्तालयाने आंदोलनाची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांसह एकही लोकप्रतिनिधी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची दखल घेण्यास आले नाही. आमदार प्रभुदास भिलावेकर यांनीही या गंभीर प्रकाराची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार रोष व्यक्त केला. आता विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या आमदारांना योग्य असा धडा शिकवू ,असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.