अमरावती - राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूरच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ तारखेला सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून हे जवान ठिकठिकाणी जाऊन जागरुकतेचा, पर्यावरणाचा संदेश देत आहेत. ही रॅली आज(बुधवार) अमरावतीत दाखल झाली आहे.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूरच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ तारखेला सुरू झालेली १६९ जवांनाची सायकल रॅली आज(बुधवार) जिल्ह्यात दाखल झाली आहे. या रॅलीच्या माध्यमातून हे जवान ठिकठिकाणी शाळेत जाऊन विद्यार्थीनींना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्वरक्षणाचे धडे, बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देत आहेत. या सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीस जास्त सायकलिंग करण्याचे आवाहन देखील याद्वारे करण्यात आले आहे. पुढील १० दिवस ही सायकल रॅली चालणार असून ७०० पेक्षा अधिक किमीचे अंतर राज्य राखीव पोलीस बलाचे जवान सायकलिंगच्या माध्यमातून कापणार आहेत.
हेही वाचा - 'नारायण राणे कुण्या पक्षात किती काळ टिकतील हे त्यांनी स्वत: तपासून पाहावे'
राज्य राखीव पोलीस बलाचे अनेक जवान हे गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावत असतात. आत्तापर्यंत शेकडो राज्य राखीव पोलीस बलाचे जवान शहीद झालेत. या माध्यमातून शहिदांच्या आठवणींना उजाळाही दिला जात आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या त्यामुळे होणारे प्रदूषण आणि त्यातून होणारे आजार टाळण्यासाठी जास्तीस जास्त सायकलिंग करणे फायद्याचं असल्याचा संदेश दिल्या जात आहे. नागपूरवरुन सुरू झालेल्या या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत असून या सायकल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नव्हे, केवळ मुंबईचे