अमरावती - खातेवाटपात राज्य मंत्री बच्चू कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यांसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. खातेवाटपानंतर "शेतकऱ्याची अडवणूक करणे चुकीचे आहे. प्रत्येक सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन. जेणेकरून मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याआधीच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील" अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा - पदापेक्षा काम महत्त्वाचे, बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना सल्ला
मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. जलसंपदा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विदर्भात त्याची गरज आहे. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्राचे पाणी नियोजन करून भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात जे चांगले अधिकारी आहेत त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र, विनाकारण त्रास देणाऱ्यांना बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून अद्दल घडवणार, अशी तंबीही त्यांनी यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिली आहे.