अमरावती - परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस या पिकाच मोठे नुकसान केले आहे. त्यातच मोठ्या मेहनतीने बाजार समितीत विकायला आणलेला सोयाबीन देखील पावसामुळे पुन्हा खराब होउन नुकसान झालंय. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत घडला आहे. शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल सोयाबीन पावसात भिजले आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आधी शेतामध्ये पावसाने ओले झालेले सोयाबीन शेतकऱ्यांनी घरी आणले. त्यानंतर ते सोयाबीन खराब होण्याच्या भीतीने बाजार समितीमध्ये विकायला आणले होते. मात्र बाजार समितीमध्ये शेड अपुरे असल्याने दर्यापूर बाजार समितीतील शेकडो क्विंटल सोयाबीन पावसामुळे खराब झाले. याबाबत माहित मिळताच अमरावती जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी बाजार समितीमध्ये जाऊन सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.