अमरावती- जिल्ह्यातील ६५ टक्के शेतकऱ्यांनी पेरणीचे काम आटोपले आहे. परंतु, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. नुकतेच कोंब फुटून बाहेर आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेरून पाणी द्यावे लागत आहे.
यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी उरकली. शेतकरी पेरणीतून मोकळे झाले. मात्र, आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उगवलेले पीक माना टाकत आहे. कोमेजणाऱ्या पिकाला आता पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पाणी द्यायला सुरूवात केली आहे.
हेही वाचा... ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका; रिसोड तालुक्यात 400 हेक्टर शेतीचे नुकसान
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पिके सध्या सुकत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीला पाणी आहे, ते शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करुन पाणी देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचे पीक वाया जाण्याची भीती आहे. तसेच लोडशेडींगची समस्या असल्याने शेतकरी चहुबाजूने संकटात सापडला आहे.