अमरावती - एकीकडे देशभरात आज ‘फादर्स डे’ साजरा होत असताना, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड या गावात पिता आणि पुत्राच्या वादात जन्मदात्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक महादेव रवाळे असे पित्याचे नाव असून, मुलाच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मोर्शी पोलिसांनी आरोपी मुलगा प्रशांत रवाळेला अटक केली आहे.
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड गावात राहणारे अशोक रवाळे यांची मुलगी ही बाळंतपणासाठी माहेरी आली होती. दरम्यान, या मुलीचा आणि पित्याचा वाद सुरू असताना अशोक रवाळे यांनी तिला घराबाहेर निघून जाण्यास सांगितले. तिने हा प्रकार आई व भावास सांगितल्याने वडील व मुलात वाद झाला. अशोक रवाळे यांना डोक्याला जबर मार लागून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती गावात पसरताच मोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली.
मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अशोक रवाळे यांचा मृतदेह मुळशी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी मोर्शी पोलिसात आरोपी मुलगा प्रशांत अशोक रवाळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.