अमरावती - वीज बिलावरून शरद पवार हे अदानी यांना भेटल होते. त्यानंतर त्यांनी या मुद्यावरून यू-टर्न घेतला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. दरम्यान या गोष्टीत नखा एवढेही तथ्य नसून चर्चेत राहण्यासाठी काही लोक मोठ्या लोकांची नावे घेतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली. आज अमरावतीमध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचीदेखील उपस्थिती होती.
राज्यस्तरीय बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे -
आज अमरावती येथील पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी पीएचसी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आदींसाठी सुविधा उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधीची तरतूदही करण्यात येत आहे. 31 मार्चच्या आधी तसा शासन निर्णय जाहीर होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. निधी वितरण खर्च यात सुस्पष्टता राहण्यासाठी आयपास प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाला बक्षीस -
राज्यातील सहा महसूल विभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहन म्हणून पंचवीस ते पन्नास कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. निधीचा संपूर्ण विनियोग करणे, अखर्चित निधी शिल्लक न राहणे, अनुसूचित जाती जमाती आदींसाठीच्या निधीचा पूर्ण विनियोग करणे, आदी निकष त्यासाठी ठरविण्यात आले आहे.
पाच जिल्ह्यासाठी कोट्यवधीची तरतूद -
आज झालेल्या या विभागीय बैठकीत वार्षिक नियोजन निधीत वाढ करण्यात आली असून त्यानुसार 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळसाठी 325 कोटी, अकोल्यासाठी 185 कोटी, बुलडाणा जिल्ह्यासाठी 295 कोटी आणि वाशिमसाठी 185 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा - किरीट सोमैया मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आयकर विभागात तक्रार करणार